तुम्ही अनेकदा आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड ही नाव ऐकली असतील. ही दोन्ही कार्ड भारत सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमाचा भाग आहेत, पण त्यांचे उद्देश आणि फायदे पूर्णपणे वेगळे आहेत. महाराष्ट्रातील माझ्या बांधवांना या दोन्ही कार्डांमधील नेमका फरक सोप्या भाषेत कळावा, यासाठी हा लेख लिहिण्यात आला आहे.
या दोन कार्ड्सची तुलना दोन वेगवेगळ्या, पण आरोग्य सेवेसाठी महत्त्वाच्या साधनांशी करता येईल. एक आहे डिजिटल आरोग्य ओळखपत्र (ABHA) आणि दुसरे आहे मोफत उपचारांची हमी ! (Ayushman)
आभा कार्ड (ABHA Card) म्हणजे काय ?
आभा कार्ड म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (Ayushman Bharat Health Account). यालाच सुरुवातीला आरोग्य ओळखपत्र (Health ID Card) म्हणून ओळखलं जायचं.
हा एक डिजिटल ओळखपत्र असून शासनाकडून याला 14 अंकी विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे. आभा कार्डच्या माध्यमातून तुमच्या सुरुवातीपासूनच्या ते शेवटपर्यंतच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल स्वरूपात साठविल्या जातात.
🔹 उद्देश : तुमच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या दवाखान्यातील सर्व वैद्यकीय माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात साठविणे.
🔹फायदा : कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर या कार्डचा फायदा होईल, तुम्ही महाराष्ट्रात असाल किंवा इतर ठिकाणी असाल, तरी तुमच्या आभा कार्डमुळे डॉक्टर तुमच्या संमतीने तुमची जुनी औषधे, तपासणी अहवाल, झालेले उपचार आणि निदान लगेच पाहू शकतात. त्यामुळे उपचारांमध्ये सातत्य राखले जाते आणि कागदपत्रे सांभाळण्याची गरज नसते.
🔹पात्रता : हे कार्ड प्रत्येक भारतीय नागरिक बनवू शकतो. यासाठी कोणत्याही उत्पन्नाची किंवा इतर अट नाही.
आयुष्मान भारत कार्ड (Ayushman Bharat Card) म्हणजे काय ?
आयुष्मान भारत कार्ड म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) होय, याला ‘गोल्डन कार्ड’ असेही म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा सरकारी आरोग्य विमा उपक्रम राज्य शासनाकडूनच राबविला जात आहे. याचा मुख्य उद्देश दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना योग्य आरोग्य उपचार मिळवा असा आहे.
या योजनेच्या माध्यमातून प्रति वर्ष प्रति कुटुंब 5 लाखापर्यंत आरोग्य विमा कवच दिला जातो. याचा अर्थ असा की, शासनाकडून ठरविण्यात आलेला विविध शस्त्रक्रिया व इतर आरोग्य विषयक बाबीसाठी 5 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते. यासाठी शासनाकडून काही निश्चित रुग्णालयाची यादी तयार करण्यात आली आहे.
🔹उद्देश : या कार्डद्वारे प्रति कुटुंब, प्रति वर्ष 5 लाख रुपये पर्यंतचे मोफत आरोग्य विमा कवच मिळते. यामुळे गरीब नागरिक आरोग्य विषयक उपचारापासून वंचित राहणार नाहीत.
🔹पात्रता : महाराष्ट्रातील सर्व शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ दिला जाईल. ज्यामधे पिवळा रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढर्या सुद्धा रेशन कार्डचा समावेश असेल.
🔹विविध आजारांचा समावेश : या योजनेत हॉस्पिटलायझेशनचा खर्च, टेस्ट चाचण्या, औषधे, शस्त्रक्रिया, अॅडमिट पूर्वी 3 दिवस आणि अॅडमिट नंतरचे 15 दिवसांचे खर्च समाविष्ट असतील.
जर तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचा आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड एकमेकांशी लिंक करून घेऊ शकता. यामुळे तुम्हाला उपचारादरम्यान दवाखान्यात कागदपत्रे दाखवायची किंवा सोबत घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. कारण तुमचा सर्व वैद्यकीय तपशील आभा ID द्वारे त्वरित उपलब्ध होईल.
जर तुम्ही आयुष्मान भारत योजना कार्ड काढलेला नसेल, तरी तुम्ही ABHA कार्ड काढून तुमच्या सर्व वैद्यकीय नोंदी डिजिटल स्वरूपात आभा कार्डमध्ये साठवून ठेवू शकता.