शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? या योजनेचा लाभ कसा घ्याल?

By Shubham Pawar

Published on:

महाराष्ट्र:- राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार “शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना आणली आहे. नुकतीच ही योजना राबविण्यास मान्यताही मिळाली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे.यामध्ये

  1. गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे,
  2. शेळी पालनासाठी शेड बांधणे,
  3. कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे,
  4. भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान दिले जाणार आहे.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

असे मिळणार अनुदान :

  • गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम :- यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.
  • शेळीपालन शेड बांधकाम :- 10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
  • कुक्कुटपालन शेड बांधकाम :- 100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.
  • भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग – शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

असा करा अर्ज

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. अर्जाच्या नमुन्यानुसार. सुरवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा.

त्याखाली ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाका. आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करा.

येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग, गाय- म्हैस गोठ्यांचं कॉंक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करा.

इथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्‍या जमाती, भटक्‍या विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले

कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करा.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana

तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा. लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास “हो’ म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.

रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा. अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा. शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा.

यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा. यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगितले जाईल.

त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्‍क्‍यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल.

एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

🔴 अर्ज डाऊनोड करायेथे पहा

🔴 नवीन अर्ज डाऊनलोड – येथे पहा

🔴 Sharad Pawar Gram Samridhi Yojana GR (शासन निर्णय) – येथे पहा

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment