मुंबई: गेल्या वर्षी कोरोनामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी कशाप्रकारे दहावी व बारावीची परीक्षा घेणार आहे जाणून घेऊया.
शालेय शिक्षण विभागाने दहावी-बारावीची लेखी परीक्षा घेण्याबाबत नुकतीच चाचपणी केली. विविध शिक्षक, मुख्याध्यापक संघटना, पालक संघटना, राज्य शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. त्यात पालक-विद्यार्थ्यांसह विविध तज्ज्ञांनी ऑफलाइन परीक्षा घेण्यास संमती दर्शवली आहे.
राज्य शिक्षण मंडळाने आपल्या 9 विभागीय मंडळांमधून परीक्षेच्या तयारीबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच याविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. (This year 10th and 12th written exams will be held Meeting of teachers board)
वेळापत्रक जाहीर होणार
राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च-2021 मधील लेखी परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे भरमसाठ गुण देण्यात आले. या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, यंदा ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार असून, लवकरच त्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.