नांदेड : कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी लक्ष्यांकप्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहून शेतकरी उत्पादक संघ, कंपनीकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
इच्छुकांनी मान्यताप्राप्त स्पेसिफिकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे १५ डिसेंबरपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत ज्या ठिकाणी गोदामांची व्यवस्था नाही व ज्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येतो.
Godam Bandhkam Yojana
अशा परिसरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो.
या योजनेअंतर्गत कमाल २५० टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा साडेबारा लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.
अटी व शर्तीच्या आधीन राहून शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव राष्ट्रीयीकृत बँक कर्जाशी निगडित असून, इच्छूक शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, केंद्र शासनाची ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे असावा.
लक्ष्यांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल. वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करावी व त्याची खात्री जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हे करतील.
या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालू आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे.
अपूर्ण बांधकाम, मंजूर डिझाइन, स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही.गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी माल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करण्यात यावा, असे आवाहन चलवदे यांनी केले आहे.