पुणे: देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-श्रमपत्र मिळवून देणारी योजना शेतीत कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यांना देखील लागू आहे. त्यामुळे नोंदणीकृत मजुरांना दोन लाखांपर्यंत अपघाती विम्याचे कवच मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
देशात 38 कोटी असंघटित कामगार व मजूर आहेत. त्यांची माहिती संकलित करण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम’ नावाचे एक संकेतस्थळ (पोर्टल) सुरू केले आहे. तेथे मोफत नोंदणी करता येते.
आतापर्यंत या संकेतस्थळावर देशभरातील आठ कोटींहून अधिक असंघटित कामगार, मजुरांनी नोंदणी केली आहे. (Agricultural laborers will get Rs 2 lakh for accident insurance)
कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की या योजनेचे कोणतेही काम कृषी विभागाच्या कक्षेत येत नाही. त्यावर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे नियंत्रण आहे. मात्र नोंदणीची सुविधा ऑनलाइन व मोफत आहे.
त्यामुळे गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रावर जाऊन मजुरांनी नोंदणी करून घ्यावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या मजुरांना मार्गदर्शन व मदत करावी. कारण, बहुतेक मजुरांना ही योजना माहीत नाही.
कोण ठरू शकतात लाभार्थी:-
- शेती व शेतीसंलग्न क्षेत्रातील मजूर
- रोजगार हमी योजनेवरील मजूर
- बांधकाम क्षेत्र
- मासेमारी
- रोजंदारी करणारे मजूर
- फलाटावर काम करणारे मजूर
- फेरीवाले
- घरगुती काम करणारे
नोंदणीकृत मजुराला कोणत्याही अपघातामुळे छोट्या स्वरूपाचे अपंगत्व आल्यास त्याला एक लाखाची मदत सरकार कडून दिली जाणार आहे.
अपंगत्व कायमस्वरूपी असल्यास किंवा मृत्यू झाल्यास मदतीची रक्कम दोन लाखांपर्यंत असू शकते.
संकेतस्थळावर नोंदणी करताना या गोष्टी हव्यात:-
- आधार क्रमांक
- आधार संलग्न मोबाइल क्रमांक
- बँक खात्याचा तपशील
- तसेच मजुराचे वय 16 ते 59 वर्षे या दरम्यान हवे आहे.
नोंदणी केल्यानंतर असंघटित कामगारांना ‘डिजिटल ई-श्रम कार्ड’ उपलब्ध होते. या कार्ड वरील सर्वसमावेशक खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) देशभरात कुठेही विविध कामांकरिता स्वीकारला जाणार आहे.
त्यामुळे अशा मजुरांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पुन्हा इतर ठिकाणी नोंदणी करण्याची गरज नसेल.
कुठे करावी लागते नोंदणी:- https://register.eshram.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.
नोंदणी केल्यास कोणते लाभ मिळतात:-
- अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये मिळतात.
- अपघातात कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास नोंदणीकृत मजुराला दोन लाख रुपये दिले जाते.
- तर आंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते.